सिन्नर : शहरातील देना बॅँकेतून पैसे काढून पायी चाललेल्या शेतकऱ्यांच्या हातातील ६ लाखांची रोकड असलेली पिशवी पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पळवल्याची घटना शुक्रवार (दि.८) रोजी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करूनही पल्सरचा शोध घेण्याचा प्रस्ताव केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.तालुक्यातील खंबाळे येथील कारभारी आंधळे यांनी घरून २ लाख रूपये बरोबर आणले होते. तर देना बॅँकेच्या सिन्नर शाखेतून दिडच्या सुमारास त्यांनी चार लाख रूपये काढले. ही रक्कम त्यांना आपल्या नाशिकच्या मित्राला जमिनीच्या खरेदीसाठी उसनवार म्हणून द्यायची होती. ही रक्कम नाशिकला घेवून जाण्यासाठी त्यांचे काही मित्र बॅँकेपासून काही अंतरावर कोंबडा बिडी कारखान्याच्या समोर पुणे महामार्गावर चारचाकीसह थांबलेले होते. आंधळे यांनी बॅँकेतून रक्कम काढून पिशवीत ठेवली व इतर चार मित्रांसह गप्पा मारत ते पुणे महामार्गावरील चारचाकी वाहनाकडे जात होते. महामार्गावर आल्यावर अचानक मारूती मंदिराकडून पल्सर मोटारसायलकवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या युवकाने आंधळे यांच्या हातातील पैशांची पिशवी हिस्कावून तेथून पळ काढला. क्षणात घडलेल्या या घटनेनंतर पल्सर मोटारसायकल सुसाट वेगाने जुन्या संगमनेर नाक्याकडे निघून गेली. या पल्सरचा नंबर कोणालाही दिसू शकला नाही.
सिन्नरला सहालाख रूपये लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 5:41 PM