सिन्नर : निवडणूक काळात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभेची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आणि लोकशाही अबधित ठेवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सिन्नरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील, निवासी नायब तहसीलदार दत्ता जाधव, दिलीप पवार, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र वाघ आदींच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली.सिन्नर विधानसभा मतदारसंघात ३२९ मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सुमारे १ हजार ११७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या असल्याचे प्रांत कावरे यांनी सांगितले. त्यात ११४४ पुरुष तर ७३ महिला कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. एका मतदान केंद्रावर तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असेल. ३५७ शिपायांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आलेली आहे. आचारसंहिता पक्षप्रमुख म्हणून गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.एकूण ५५ मार्गावर ४५ बसेस, सहा जीपगाड्या व चार मिनीबसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सिन्नरला चार भरारी पथकांद्वारे निवडणूक हालचालींवर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 3:05 PM