शैलेश कर्पे,
सिन्नर: चालू पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा लाल दिव्याचा बहुमान शीतल उदय सांगळे यांच्या रुपाने सिन्नर तालुक्याला पहिल्यांदाच मिळाला. या लाल दिव्याच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली. शीतल सांगळे यांच्या तीन वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सिन्नरच्या सर्वच सहा जिल्हा परिषद गटात भरीव विकासकामे दिसून आली.
सिन्नर तालुक्यात सहा परिषद गट असून साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली सहापैकी ५ जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तर त्यावेळी भाजपात असलेल्या व सध्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे देवपूर गटात भाजपाच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. सिन्नर तालुक्यात सहापैकी पाच जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे विजयी झाल्याने या बळावर माजी आमदार राजाभाऊ वाजे व शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांनी सिन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व लाल दिवा खेचून आणला होता.
शीतल सांगळे या पदार्पणातच चास गटातून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्या आणि थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. राजकारणात नवख्या असूनही सांगळे यांनी कोट्यवधींची विकासकामे केवळ चास गटात न आणता संपूर्ण तालुक्यात आणली. सिन्नरला सर्वाधिक निधी पळविला जात असल्याचा आरोपही त्यावेळी त्यांच्यावर झाला. मात्र गेल्या अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यात सांगळे यांचे योगदान उल्लेखनीय राहिले.
देवपूर जिल्हा परिषद गटात भाजपाकडून सिमंतीनी माणिकराव कोकाटे विजयी झाल्या होत्या. वडिलांकडून राजकारणाचे बालकडू मिळालेल्या कोकाटे यांनी जिल्हा परिषदेत आपल्या वक्तृत्वाने छाप पाडली. पाणीपुरवठा योजनांची कामे, आरोग्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठा निधी आणला. सिमंतीनी कोकाटे भाजपाकडून विजयी झाल्या, मात्र भाजपात न रमता त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून निधी आणण्यात योगदान दिले. मुसळगाव जिल्हा परिषद गटातून वैशाली दीपक खुळे शिवसेनेकडून विजयी झाल्या. त्यांनी बंधारे, जलसंधारण विभागाच्या योजना, शाळा खोल्या, अंगणवाडी, रस्ते यांच्यासाठी जिल्हा परिषदेकडून विकासनिधी आणला. पाणीपुरवठा योजनांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. ठाणगाव गटातून शिवसेनेच्या वनिता नामदेव शिंदे विजयी झाल्या. पाणीपुरवठा योजनांबाबत त्यांनी लक्षवेधी काम केले. नायगाव गटातून सुनीता संजय सानप या शिवसेनेकडून अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्या होत्या. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना, बंधारे व पाझर तलाव दुरुस्ती, स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारती, रस्ते, शाळा खोल्या यांच्यासाठी कोट्यवधींचा निधी आणून कामे करण्यात सानप यांना यश आले. सहा जिल्हा परिषद सदस्यांपैकी नांदूरशिंगोटे हा एकमेव गट पुरुषाकडे राहिला. या गटातून नीलेश केदार शिवसेनेकडून विजयी झाले. केदार यांनी दळणवळण सुविधा, पाणीपुरवठा योजना, बंधारे यांच्यासाठी विशेष निधी आणला.
चौकट-
पक्षीय बलाबल
एकूण गट- ६
शिवसेना-५
भाजपा(तांत्रिकदृष्ट्या)- १
इन्फो
महाविकास आघाडीची परीक्षा
सिन्नर तालुक्यातील राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठकडे झुकते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा एक गट तर शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवानेते उदय सांगळे यांचा दुसरा गट आहे. पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेला महत्त्व दिले जाते. सध्या राज्यात महाविकास आघाडी असली तरी या दोन नेत्यांमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून एकमत होणे अवघड आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसह तालुक्यातील स्थानिक नेत्यांची परीक्षा होणार आहे.
फोटो-
१) शीतल सांगळे
२) सिमंतीनी कोकाटे
३) वैशाली खुळे
४) वनिता शिंदे
५) सुनीता सानप
६) नीलेश केदार