सिन्नर : खासगी आराम बसने धडक दिल्याने सिन्नर तालुक्यातील दातली (केदारपूर) येथील चौदावर्षीय मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली. रविवारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील दातलीफाटा येथे सदर अपघात झाला.श्वेता खंडेराव साळवे (१४), रा. दातली ही सिन्नर-शिर्डी रस्त्याने पायी चालली असताना पाठीमागून आलेल्या खासगी बसने (क्र. एमएच ०४, एमके १३११) तिला जोरदार धडक दिली. त्यात श्वेता हिला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर खासगी आराम बस शिर्डीच्या दिशेने फरार झाली. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी वावी पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती दिल्याने या मार्गाने जाणाऱ्या सर्व खासगी आराम बसेस अडविण्यात आल्या. तोपर्यंत सदर बस शिर्डीच्या दिशेने निघून गेली होती. तथापि, वावी पोलिसांनी अडविलेल्या बसचालकांकडून अपघातग्रस्त आराम बसची माहिती मिळाली. पोलिसांनी शिर्डी येथे जाऊन खात्री केली असता, सदर बस मिळून आली. मात्र चालक फरार झाला होता. या प्रकरणी अंकुश साळवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अपघाताची नोंद करण्यात आली असून, निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. एम. खतीले अधिक तपास करीत आहेत. मानोरी येथील युवक ठारसिन्नर : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तालुक्यातील मानोरी येथील युवक ठार झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री वडांगळी-देवपूर रस्त्यावरील निमगाव शिवारात सदर अपघात झाला. तुषार विलास साबळे (२७), रा. मानोरी हे पक्ष्यांचे डॉक्टर होते. पोल्ट्री फार्मच्या कामानिमित्ताने ते दुचाकी (क्र. एम. एच. १५, डी. आर. ५३९४)ने चांदवड येथे गेले होते. रात्री घरी येण्यास उशीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन केला असता, काही वेळातच पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, रविवारी सकाळी निमगाव शिवारात दुचाकीसह तुषार यांचा मृतदेह मिळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून, निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एन. एस. कुऱ्हाडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
सिन्नरला वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
By admin | Published: December 20, 2015 11:08 PM