सिन्नर : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या २०२०-२५ सालासाठी महिला सरपंच आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. ५) तहसील कार्यालयात काढण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. तालुक्यात ११४ पैकी १०० ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यातील सरपंच आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. तथापि, त्यात ५० टक्के महिला सरपंच होणार आहेत. सदर सोडत ३ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात काढण्यात येणार होती. तथापि, ३ फेब्रुवारी रोजी राज्यपाल जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने सदर सोडत शुक्रवारी काढण्यात येणार आहे. प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. यावेळी संबंधित ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी केले आहे. महिला सरपंच आरक्षणात अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी ७, नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी १५, तर सर्वसाधारण जागेसाठी ३२ ठिकाणी महिला सरपंच विराजमान होणार असल्याची माहिती देण्यात आली. ११४ पैकी ५८ ठिकाणी महिला सरपंच असणार आहे.
सिन्नरला उद्या महिला सरपंच आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:49 AM