सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी प्रगतीचे हेमंत वाजे यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली होती.सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व विश्वस्तपदाच्या ९ जागांसाठी सत्ताधारी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध निवडीची परंपरा गेल्या निवडणुकीपासून खंडित झाली होती. शुक्रवारी ५२१ पैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ४ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. महिलांसाठी राखीव असलेल्या कार्यकारिणी सदस्य तथा विश्वस्तपदाच्या दोन जागांवर प्रगती पॅनलच्या विद्यमान सदस्य निर्मल ताराचंद खिंवसरा (३८३) व प्रज्ञा प्रशांत देशपांडे (४१४) ह्या विजयी झाल्या, तर परिवर्तनच्या डॉ. कल्पना परदेशी (७६) पराभूत झाल्या. त्यानंतर विश्वस्तपदाच्या सातही जागांवर प्रगतीचे उमेदवारमताधिक्यानेविजयी झाले. चंद्रशेखर कोरडे (३५९), सागर गुजर (३५८), मनीष गुजराथी (३३६), जितेंद्र जगताप (२९१), राजेंद्र देशपांडे (३५६) विलास पाटील (३३१), संजय बर्वे (३३०) हे विजयी झाले. तर परिवर्तनचे नामदेव कोतवाल (१४२), डॉ. श्यामसुंदर झळके (९६), विजय कर्नाटकी (१२१), अशोक घुमरे (९५), अजय शिंदे (१०६), अॅड. गोपाळ बर्के (८२) यांना पराभव स्वीकारावा लागला. उपाध्यक्षपदाच्या निवडीत प्रगतीचे नरेंद्र वैद्य (२९३) व पुंजाभाऊ सांगळे (३४०) यांनी परिवर्तनचे राजेंद्र अंकार (११०) व अॅड. विलास पगार (१०७) यांचा सरळ लढतीत पराभव केला. अध्यक्षपदासाठी झालेल्या दुरंगी लढतीत प्रगतीचे उमेदवार व वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत (३८५) यांनी परिवर्तनचे डॉ. जी. एल. पवार (७५) यांचा तब्बल तीनशे मतांनी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. शिवाजी देशमुख यांनी काम पाहिले.
सिन्नर वाचनालय पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:07 PM