सिन्नर : तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेची २४ पैकी १७ कामे युवामित्र या एकाच संस्थेला का देण्यात आली याची माहिती दिली जात नाही, त्याचबरोबर गेल्या सभेत मंजूर झालेले ठराव व चर्चिले गेलेले विषय इतिवृत्तात सविस्तर लिहिले जात नसल्याचा आरोप करीत विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीतून सभात्याग केला. भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी आपण त्यांना लेखी माहिती दिल्याचा खुलासा करीत झालेल्या कामांचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यास तयार असल्याचे सांगितले.पंचायत समितीची मासिक आढावा बैठक सभापती सुमन बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. व्यासपीठावर उपसभापती वेणूबाई डावरे, गटविकास अधिकारी भारत धिवरे उपस्थित होते. सभेला प्रारंभ होताच गेल्या सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यासंदर्भात चर्चा सुरू होताच पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांनी गेल्या बैठकीत झालेल्या विषयांचा यात उल्लेख केला गेला नसल्याचा आरोप केला. मराठा समाजाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करूनही त्याचा उल्लेख नसल्याचे ते म्हणाले. मात्र शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे यांनी सदर विषय इतिवृत्तात आल्याचे दाखवून दिले. त्यानंतर पगार यांनी जलयुक्त शिवार योजनेचे २४ पैकी १७ कामे एकाच युवामित्र संस्थेला का देण्यात आली याची विचारणा केली. लघु पाटबंधारे विभागाकडे माहिती मागूनही ते देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत युवामित्र संस्थेने केलेल्या कामांचे अंदाजपत्रक व झालेल्या कामांचे एमबी रेकॉर्ड दिले जात नसल्याचा आरोप रवींद्र पगार यांनी केला. सदर विषय ऐनवेळच्या विषयात घेऊ ही कातकाडे यांची मागणीही फेटाळून लावली. चार महिन्यांपासून याची माहिती मागूनही अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप पगार यांनी केला. लघु पाटबंधारे विभाग याची माहिती देत नसल्याच्या निषेधार्थ भाजपाचे सदस्य सभात्याग करीत असल्याचे सांगत पगार यांच्यासह योगिता कांदळकर, तातू जगताप सभागृहाच्या बाहेर पडले.
सिन्नरला भाजपा सदस्यांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:30 PM