सिन्नर : नगर परिषद कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून प्रबोधन रॅली काढण्यात आली.दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन महिला बचतगटातील महिलांनी सावित्रीबाई व महात्मा जोतिबा फुले यांच्या वेशभूषा केल्या होत्या. सर्वांनी रंगीबेरंगी कलरच्या वेशभूषा करून, सावित्रीबाई यांच्या पुतळ्यासमोर व नगर परिषद कार्यालयासमोर मोठ्या रांगोळी काढून महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत आनंद उत्सव साजरा केला.नगरसेवक चित्रा लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई यांच्या विषयी वर्षा क्षीरसागर, सविता लोंढे, अलका गाडेकर यांनी सावित्रीबाई यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले व शकुंतला सटवे यांनी सावित्रीबाई यांच्याविषयी गीत सदर केले. सर्व महिलांनी ज्ञानाई सावित्रीबाई यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्व महिलांनी स्वत: सावित्री बनणे गरजेचे आहे. आपल्या लहान मुला-मुलींना त्यांचे विचार आचरणात आणण्यास प्रवृत्त करावे. समाजामध्ये न्याय हक्कासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात नगसेवक चित्रा लोंढे यांनी व्यक्त केले व उपस्थित सर्वांना सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास महात्मा फुले विद्यालयाचे विद्यार्थिनी पथक, मुख्याध्यापक वंदना साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली लोंढे व सुरेखा ठाकूर या शिक्षिकांसह विद्यार्थिनी उपस्थित झाल्या होत्या.सिन्नर नगर परिषद कार्यालयात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून बचतगट, वस्ती स्तरीय संघास नोंदणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सर्व गटांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अंगीकार योजनेची माहिती देण्यात आली. वर्षा क्षीरसागर यांनी सावित्रीबाई व सविता लोंढे यांनी महात्मा जोतिबा यांची वेशभूषा केली होती. विशेषत: विदश्री विजय कापुरे या लहान मुलीने सावित्रीबाई यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते.यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंदराव लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, नामदेव लोंढे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगर परिषद कार्यालयापासून वावी वेस येथील डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या पुतळ्यास करनिर्धारक नितीन परदेशी व अनिल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वावी वेस-गणेश पेठ-नेहरू चौकमार्गे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास नगसेविका चित्र लोंढे, सुजाता भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सिन्नरला नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांची प्रबोधन रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 10:33 PM