सिन्नर : सिन्नर-नायगाव रस्त्यावरील गोविंद गोपाळ लॉन्सजवळ नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याने परिसरात पाण्याचे डबके साचले असून रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करणारे हे तातडीने बुजवावे अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.नायगांव रस्त्यावर अनेक निवासी इमारती असून त्यांचे सांडपाणी बंदिस्त गटारीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या छोट्या नाल्यात सोडण्यात आले आहे. नुकतेच कडवा धरणावरील पाणीपुरवठा योजनच्या पाइप लाइनचे काम पूर्ण झाले असून या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह टाकण्यात आला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून नाल्यामध्ये येणाºया सांडपाण्यामुळे तेथे मोठे डबकेच बनले आहे. त्यात कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. सध्या जगभरात ‘कोरोना’चे संकट उभे असताना परिसरातील रहिवाशांना या डबक्यामुळे वाढलेल्या डासांनी घरात बसणे अवघड केले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांमध्ये औषध फवारणी सुरु आहे. मात्र, त्यांनतरही दुर्गंधीआणि डासांपासून मुक्तता मिळालेली नाही.हे डबके बुजवण्याबाबत नगर परिषदेकडे वेळोवेळी अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. मात्र, नगर परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील रहिवाशांना सध्याच्या संचारबंदीत घरात राहणे अवघड झाले आहे. नगर परिषदेने व्हॉल्व्हवरून होणाºया पाण्याची गळती थांबवावी व डबके तातडीने बुजवून आरोग्याच्या गंभीर होऊ पाहणाºया प्रश्नापासून परिसरातील रहिवाशांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
सिन्नर-नायगाव रस्त्यावर गळतीमुळे डबके साचल्याने आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:17 PM