लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी बळीराजाने पहिल्यांदाच संपाचे हत्यार उपसल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील गावातून कुठलाही शेतीमाल कृषी बाजार समितीमध्ये गेला नाही. तर भाजी बाजारातील विक्रेत्यांनी गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी भाजीबाजारात संपाचा परिणाम जाणवला नाही.शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी पहिल्यांदाच गुरुवारपासून संपाचे हत्यार उपसले होते. शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता व शासनाविरुद्ध असलेला संताप शहराबाहेरील ग्रामीण भागात जाणवत होता. संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्रीपर्यंत भाजीबाजारात विक्रेत्यांकडे शेतीमाल व भाजीपाला उतरविला जात होता. त्यामुळे भाजीविक्रेत्यांकडे एक-दोन दिवस विक्रीकरिता येईल इतका भाजीपाला उपलब्ध असल्याचे गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी भाजीबाजारात संपाचा जास्त असर जाणवला नाही. मात्र कांदा, बटाटे, फळ, भाजी व इतर काही भाज्या या चार-पाच दिवस टिकत असल्याने त्यांचा साठा बहुतांश विक्रेत्यांकडे आहे. मात्र हिरवा भाजीपाला हा लवकर नाशवंत होत असल्याने शुक्रवारी दुपारनंतर भाजीबाजारात त्यांची टंचाई भासण्याची दाट शक्यता आहे. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावातून गुरुवारी कुठलाही शेतीमाल, भाजीपाला हा कृषी बाजार समिती, भाजी मार्केटमध्ये विक्रीसाठी आला नाही. सिन्नरफाटा येथील कृषि बाजार समितीचा उपबाजारात हा शेतकऱ्यांच्या संपामुळे शुकशुकाट पसरला होता. शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण ताकदीसह संप यशस्वी केल्याने शुक्रवारपासून बाजारात दूध, भाजीपाला आदिंचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकरोड भागातूनदेखील मुंबई-ठाण्याला भाजीपाला घेऊन जाणारा एक ट्रकसुद्धा गेला नाही. तसेच नाशिकरोड व आजुबाजूच्या ग्रामीण भागातून दुधाचे संकलन झाले नाही. संगमनेर, लोणी, बाभळेश्वर व नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नाशिक-पुणे महामार्गाने मुंबई, ठाणे, नाशिक आदि ठिकाणी दूध येते. मात्र शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांमुळे त्यांनीदेखील दुधाचे टॅँकर पाठविले नाही. यामुळे शुक्रवारपासुन दुधाचादेखील तुटवडा भासणार असल्याचे बोलले जात आहे.
सिन्नर फाटा उपबाजार समितीत शुकशुकाट
By admin | Published: June 02, 2017 1:47 AM