सिन्नर : सिन्नर मतदारसंघात सुमारे ६९ टक्के मतदान झाले. २८१ मतदान केंद्रावरील मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. मतदानाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री सोनारी येथे झालेली हाणामारी व मतदानाच्या दिवशी किरकोळ बाचाबाची वगळता मतदार संघात शांततेत निवडणूक पार पडली. सायंकाळी तालुक्यातल्या बारागावपिंप्री येथे तणाव निर्माण झाला होता. सिन्नर मतदार संघात सकाळी ९ वाजता ८ टक्के, सकाळी ११ वाजता १५ टक्के, दुपारी १ वाजता ४० टक्के तर सायंकाळी पाच वाजता ६२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी नऊ वाजता निमगाव-सिन्नर येथे तर दुपारी दोनच्या सुमारास वारेगाव येथील मतदान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने मशीन बदलावे लागले. आॅक्टोबर हिटमुळे दुपारी मतदारांचा वेग काहीसा मंदावला होता. दुपारी ४ वाजेनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. काही मतदान केंद्रावर अतिशय संथ गतीने मतदान होत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे मतदानाला उशीर होत होता. ठाणगाव येथे उशीरापर्यंत मतदान सुरु होते.दुपारपर्यंत मतदानाचा वेग सर्वसाधारण होता. दुपारनंतर मतदानासाठी मतदारांची रीघ लागली. शेतीची कामे आणि तोंडावर आलेल्या दिवाळी सणाची कामे यामुळे महिला वर्गाने दुपारनंतर मतदान करणे पसंत केले. भाजपाचे उमेदवार माणिकराव कोकाटे व शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यात दुरंगी लढत दिसून आली. मतदान आटोपल्यानंतर सायंकाळी ६ वाजता लगेचच ठिकठिकाणी आकडेमोडीला सुरुवात झाली होती. चौकाचौकात जेथे लोक जमतील तेथे याच विषयावर चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांचा बालेकिल्ले असलेल्या गावांत किती मतदान झाले, त्यात वाजेंना किती व कोकाटेंना किती मते मिळतील याचा अंदाज घेतला जात होता.