पांगरी : उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर ग्राहकांच्या घशाला थंडावा देणाऱ्या रसवंतीगृहे व शीतपेय दुकानांतील गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून तपमानात वाढ झाल्यामुळे सिन्नर- शिर्डी रस्त्यावरील रसवंतीगृहे व शीतपेयांची दुकानांमध्ये गर्दीने फुलून गेली आहे. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबई, गुजरात, नाशिक येथील भाविकांची या रस्त्याने मोठी वर्दळ असते. पांगरीजवळ सर्वाधिक रसवंतीगृहे असल्याने प्रवासी तेथे थांबणे पसंत करतात. साईभक्तांना वाहने उभी करण्यासाठी मोकळी व सुरक्षित जागा, पिण्याचे पाणी व बसण्यासाठी खुर्च्या या सुविधा देण्यासाठी दुकानदार तत्पर असतात. उसाच्या रसात आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने साईभक्तांचा ओढा उसाच्या थंडगार रसाकडे जास्त दिसून येतो. रसाबरोबर विविध कंपन्यांची शीतपेये, दही, लस्सी, आइस्क्रीम यांनाही मागणी वाढली आहे. तसेच, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठालाही मागणी दिसून येते. उन्हापासून संरक्षण करणारे चष्मे, टोप्या आदि वस्तू बाजारामध्ये दाखल झाल्या असून, वाढत्या उन्हाबरोबर त्यांचीही मागणी वाढली आहे. परीक्षांचा हंगाम सुरू होणार असल्याने शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी असली तरी सुट्या लागताच गर्दी वाढणार आहे. यामुळे तरुणवर्गास रसवंती व अन्य व्यवसायातून रोजगार मिळणार आहे. वाढत्या उन्हाबरोबर भारनियमन वाढत जाणार असल्याने त्याचा विपरित परिणाम शीतपेय विकणाऱ्या व्यावसायिकांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रसवंती व्यवसाय करणाऱ्यांनी डिझेलवर चालणाऱ्या पीटर यंत्रावर रसवंतीगृहे चालू ठेवणे पसंत केले आहे. (वार्ताहर)
सिन्नर-शिर्डी रस्ता : आयुर्वेदिक गुणधर्मामुळे उसाच्या रसाला ग्राहकांची पसंती
By admin | Published: February 15, 2015 10:52 PM