सिन्नर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शीतल उदय सांगळे विजयी झाल्यानंतर शिवसैनिकांनी येथे एकच जल्लोष केला. चौकाचौकात आतषबाजी व गुलालाची उधळण करताना कार्यकर्ते दिसून येत होते. ग्रामीण भागातही आनंदोत्सव साजरा करत निवडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिन्नर तालुक्यातून शिवसेनेचे सर्वाधिक पाच सदस्य विजयी झाल्याने अध्यक्षपद सिन्नरला मिळेल याची चर्चा होती. शीतल सांगळे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सिन्नरच्या सर्वच व्हॉट्सअॅप ग्रुपवर अभिनंदनाचे वर्षाव सुरू झाले होते. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर व सौ. सांगळे यांना विजयी घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन जल्लोष करण्यास प्रारंभ केला. दुपारी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व शिवसेनेच्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचे सिन्नरला आगमन झाले. आमदार वाजे यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार वाजे यांनी सौ. सांगळे यांना लाल दिव्याच्या गाडीत बसवले. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सौ. शीतल सांगळे यांच्या विजयी मिरवणुकीत आमदार वाजे यांच्यासह नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूबाई डावरे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सुनीता सानप, वैशाली खुळे, वनिता शिंदे, संग्राम कातकाडे सहभागी झाले होते. (वार्ताहर)
सिन्नरला शिवसेनेचा जल्लोष
By admin | Published: March 22, 2017 12:01 AM