सिन्नर : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासून भैरवनाथ महाराज मुखवट्याच्या रथाची व कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारपासून प्रारंभ झालेली यात्रा दोन दिवस चालणार आहे. नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील भैरवनाथाच्या चरणी लीन होण्या साठी जिल्हाभरातून भाविक आले होते. सकाळी ६ वाजता भैरवनाथ मंदिराचे मुख्य पुुजारी ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत, आमदार राजाभाऊ वाजे, दीप्तीताई वाजे यांच्या हस्ते रथपूजन करण्यात येऊन ढोल-ताशाच्या निनादात व टाळमृदंगाच्या गजरात रथाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. नाशिकवेस, गंगावेस, खडकपुरा, लाल चौक, महालक्ष्मी रोड, वावी वेस, लोंढे गल्लीतून गावठा, तानाजी चौक, गणेश पेठ, शिंपी गल्ली, नाशिक वेस अशा शहराच्या जवळपास सर्वच रस्त्यावरून रथ व कावडींची मिरवणूक काढण्यात आली. रथाला श्रीफळ वाढवून दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भजनी मंडळाची दिंडी काढण्यात आली होती. पाचोरे घराण्याकडे रथ हाकण्याचा मान होता. रथावर दोन्ही बाजूस भालदार-चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालीत होते. रथ दर्शनासाठी आबालवृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. बैलाचा खांदा रथाच्या जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. सजवलेल्या बैलांना रथास जुंपल्यावर थोडासाच रथ पुढे सरकला की, दुसरा शेतकरी बैल घेऊन हजररहात होते. दिवसभर ही लगबग सुरू होती. रथाच्या जोखडावर घरोघरी नारळ वाढविले जात होते. घरोघरी आलेले पाहुणे आणि मित्रांच्या स्रेहभेटींनी जणू आनंदाची पर्वणी असल्याचा भास होत होता. त्यास लाभलेल्या भक्तीच्या कोंदणात सिन्नरनगरीतले रस्ते रांगोळ्यांनी सजले होते. चौकाचौकात आबालवृद्धांच्या ओेसंडत्या उत्साहाने तरुण मंडळांनी कावडीधारकांसाठी अल्पोपाहार, सरबताची व्यवस्था केली होती. रथामागे असलेल्या कावडी धारकांचे पदप्रक्षालन व प्रसाद वाटपासाठी मोठी गर्दी झाली होती.कावडीधारकांनी केले प्रबोधनसिन्नर शहरातून काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत अनेक कावडीधारक सहभागी झाले होते. या कावडीधारकांची मनोभावे पूजा केली जात होती. काही कावडीधारकांनी खांद्यावर कावडीसह विविध फलक घेतले होते. या फलकाद्वारे त्यांनी प्रबोधनाचा प्रयत्न केला. ‘सरस्वती नदी स्वच्छता अभियान, पर्यावरण वाचवा, स्वच्छ सिन्नर, सुंदर सिन्नर’ आदी प्रबोधनात्मक फलक दिसून आले. वर्षानुवर्षे सरस्वती नदीकडे दुर्लक्ष केल्याने तिचे अस्तित्व संपत चालले असल्याची खंत या फलकांमध्ये व्यक्त करण्यात आली होती.भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त रथ व कावडी मिरवणूक सकाळी ६ पासून सुरू झाल्यानंतर सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहते. जवळपास १२ तास सुरू असलेल्या रथ मिरवणुकीत सकाळपासून सहभागी झालेले कावडीधारक दिवसभर रथाच्या मागोमाग चालतात. दुपारी चटका देणाºया रणरणत्या उन्हातही कावडीधारकांच्या चेहºयावरील उत्साह ओसंडून वाहत होता. परिसरातील शेतकरी बैलांना घेऊन येत होते. भरउन्हातही रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सिन्नरला भैरवनाथ यात्रेस उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:24 AM