गेल्या दोन महिन्यात सिन्नर शहर व तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या अतिशय कमी झाली होती. त्यानंतर लग्नसराईत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्यानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र आहे. गेल्या सात दिवसात सिन्नर तालुक्यात नव्याने ९३ जण बाधित आढळून आले. गुरुवार (दि. ११) रोजी १० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडियाबुल्स रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत सिन्नर तालुक्यात ४१५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, नगरपरिदषेदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. निर्मला पवार-गायकवाड, डॉ. लहू पाटील यांच्यासह आरोग्य विभागाची टीम कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
इन्फो
नियमांचे सर्रास उल्लंघन
बुधवारपासून शहर व तालुक्यात अंशत: लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र अनेकांनी दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचे बुधवारी दिसून आले. मास्कचा वापर, अस्थापना सुरु व बंद करण्याची वेळ, आठवडे बाजार बंदचा निर्णय, सामाजिक अंतर पाळून बस किंवा भाजी मंडईत जाणे यांसह शासनाने दिलेल्या विविध नियमांचे पाहिजे त्याप्रमाणात पालन केले जात नसल्याचे दिसते. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून नियमांचे पालन करुन शासनास सहकार्य करण्याची गरज अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.