सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोल नाक्यावर स्थानिकांकडून टोल वसुली न करता तालुक्यातील नागरिकांना टोलमुक्ती मिळावी, या मुद्यावर सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. आमदार माणिक कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत टोलप्रश्नी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मागणी मान्य न झाल्यास टोलमुक्तीसाठी आगामी काळात सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नजीकच्या काळात आक्रमक भूमिका घेणार असल्याचा निर्धार येथील बैठकीत व्यक्त करण्यात आला.
शिंदे येथील टोल नाक्याच्या कारभाराबद्दल बैठकीत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. घोटी व संगमनेर येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोल मोफत असावा, अशी मागणी करण्यात आली, तसेच शनिवार सकाळी ११ वाजता याबाबत संबंधित विभागांना निवेदन देण्यात येणार आहे. तथापि, स्थानिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमदार कोकाटे यांच्या नेतृत्त्वाखाली पंधरा दिवसानंतर टोल नाक्यावर हजारो नागरिकांना सहभागी घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, राजाराम मुरकुटे, सुदाम बोडके, किरण मुत्रक, अनिल वराडे, नामदेव कोतवाल, सुनील नाईक वावीचे माजी सरपंच विजय काटे, मेघा दराडे, कृष्णा कासार, नगरसेवक, वासंती देशमुख, शीतल कानडी, पी. जी. आव्हाड, मालती भोळे, योगेश माळी, रामा बुचुडे, कचरू डावखर, बाळासाहेब भोर, दर्शन कासट, नगरसेवक मल्लू पाबळे, किरण चतूर आदी उपस्थित होते.
(०९ सिन्नर येथे टोलमुक्तीसाठी आयोजित बैठकीत बोलताना बाळासाहेब वाघ, समवेत कार्यकर्ते.