सिन्नर : गेल्या अनेक वर्षांपासून टँकरसोबत अतूट नाते बनलेल्या सिन्नर तालुक्याला सलग दोन वर्षांपासून टँकरची गरज भासली नसल्याचे आशादायी चित्र आहे.
उन्हाळा आला की, गावोगावी टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना प्रशासनाची तारांबळ उडत होती. दोन वर्षांपूर्वी टँकरच्या प्रतीक्षेत गावाच्या वेशीवर नागरिकांची गर्दी दिसायची. टँकरचे आगमन होताच पाणी भरण्यासाठी झुंबड उडायची. सिन्नर तालुक्यातील हे ऑगस्ट २०१९ पर्यंतचे दुष्काळाच्या पाऊलखुणा असलेले चित्र गेल्या दोन वर्षांत पूर्णत: बदलले आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेली दर्जेदार कामे आणि धो-धो बसरलेला पाऊस यामुळे सिन्नर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला यंदाही ब्रेक लागला आहे.
दरवर्षी डिसेंबरअखेरनंतर पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करण्याचे वेध नागरिकांसह प्रशासनाला लागत असे. काही वेळा तर वर्षभर टँकर सुरू ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी तालुका टँकरमुक्त झाल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. भोजापूरसह चार धरणांत पुरेसा उपयुक्त साठा शिल्लक असून गावस्तरावरील पाणीपुरवठा योजनाही सुरळीत सुरू आहे. गतवर्षी तालुक्यात ९११ मिमी पाऊस बरसला. गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत हा सर्वाधिक पाऊस आहे. १२८ टक्के पाऊस झाल्याने पाणीसाठे काठोकाठ भरले. २०१८ ला सर्वाधिक कमी २९८.१ मिमी पाऊस पडला होता. यंदा पर्जन्यमान चांगले राहिल्याने व वर्षभर सातत्याने पाऊस पडल्याने टंचाईची स्थिती निवळली आहे. सिन्नर तालुका सलग दुसऱ्या वर्षी टँकरमुक्त राहिला आहे.
इन्फो...
४ वर्षांतील टँकरची स्थिती
सिन्नर तालुक्यात २०१६ साली ३१, २०१७ साली ६, २०१८ साली ३०, तर २०१९ साली ६८ टँकरद्वारे २७ गावे व ३१३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. तहानलेल्या गावांची तृष्णा भागविताना प्रशासनाची चांगलीच धावपळ उडत होती. सलग दुसऱ्या वर्षी टँकरने पाणीपुरवठ्याची गरज भासली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.