सिन्नर : जगातील प्रत्येक तिसरा कुपोषित बालक हा भारतातील आहे. देशातील पाच पैकी फक्त एक बालक सुदृढ आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६२९ तीव्र कुपोषित बालक आढळले आहेत. एकंदरीत कुपोषण हा एक शाप देशाला लागला आहे. त्यामुळे सिन्नर तालुका हा कुपोषणमुक्त करण्यासाठी शिव सरस्वती फाउंडेशनतर्फे सिन्नर तालुक्यातील सर्व तीव्र कुपोषित बालक कुपोषणातून बाहेर येईपर्यंत दत्तक घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील शिवसरस्वती फाउंडेशन आयोजित कुपोषणमुक्त सिन्नर या कार्यक्रमांतर्गत कुपोषित मुलांना सकस आहार व औषधे वाटप तसेच आरोग्य तपासणीच्या वेळी त्या बोलत होत्या. ६७ बालकांपैकी ४ बालकांना एनआरसीमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बालकाचे आजार, वय, उंची, वजन या तपासण्या करण्यात आल्या. सिन्नर तालुक्यात एकूण ६७ बालक तीव्र कुपोषणात असून, त्यापैकी १३ बालक हे अति तीव्र कुपोषित आहेत. नायगाव, वडांगळी, मुसळगाव, डुबेरवाडी तसेच भोकणी, नांदूरशिंगोटे, दुशिंगपूर, बारागाव पिंप्री या ठिकाणी तीव्र कुपोषित मुलांना जमा करून त्यांचे पालक व अंगणवाडी सेविका यांच्याकडे बालकाची आरोग्य तपासणी करून शिव सरस्वती फाउंडेशनच्या वतीने सात दिवसांची मोफत औषधे, काळे खजूर, शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले.
सिन्नर तालुका कुपोषणमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:10 AM