सिन्नर : कडवा धरणावरून शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीची सर्व गळती बंद करण्यात आली. त्याचबरोबर जलवाहिनीच्या हायड्रोलिक टेस्टिंगचे काम पूर्णत्वास आल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा सोमवारपासून पूर्ववत झाल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली. मागील एक महिन्यापासून शहराला कडवा योजनेचा पाणीपुरवठा बंद होता. पाणीपुरवठा करणारी मुख्य लाईन फुटण्याचे प्रकार अधून-मधून होत असल्याने उन्हाळ्यात सिन्नरकरांचे हाल होऊन नये म्हणून धरणापासून जलशुध्दीकरण प्रकल्प व तेथून संपुर्ण शहरापर्यंत जलवाहिनीची गळती शोधून दुरुस्तीचा निर्णय तसेच हायड्रोजन टेस्टिंगचे कामही नगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले होते. नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता व कर्मचारी या कामावर लक्ष ठेवून होते. दोन्ही कामे पूर्णत्वास आल्याने शहर व उपनगरांना पाणीपुरवठा यापुढे एक ते दोन दिवसाआड होणार असल्याची माहिती डगळे यांनी दिली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी योजनेची पूर्ण माहिती घेऊन पाणीपुरवठा सुुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मागील उन्हाळ्यात होणारा त्रास आता नागरिकांना होणार नसल्याची ग्वाही नगराध्यक्ष डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक यांनी दिली.
सिन्नरला कडवा योजनेचे पाणी पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 3:50 PM