सिन्नर : सेवानिवृत्त शिक्षक येथील स्टेट बॅँकेतून दोन लाख रुपये काढून पायी रस्त्याने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. येथील पाचोरे गल्लीत राहणारे सेवानिवृत्त शिक्षक पंढरीनाथ कचरू मांगटे हे बसस्थानकासमोरील स्टेट बॅँकेत दोन लाख रुपये काढण्यासाठी गेले होते. बॅँकेतून दोन लाख रुपये काढल्यानंतर पासबुक व दोन लाख रुपये त्यांनी कापडी पिशवीत ठेवले. त्यानंतर महामार्ग ओलांडून ते महात्मा फुले पुतळ्याजवळून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील दोन लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. काही समजण्याच्या आत चोरटे दुचाकीवरून फरार झाले. मांगटे यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, राहुल निरगुडे, विनोद टिळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तातडीने नाकाबंदी करून दुचाकीस्वारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बसस्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने बसस्थानक परिसरातील फुले पुतळ्याजवळील वर्दळीच्या भागातील सर्व सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले.
--------------
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
सिन्नर टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू होते. दिवसा दुपारी चोरट्यांनी बॅँकेतून पैसे काढून घरी घेऊन जाणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बॅगवर डल्ला मारल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी अधिक तपास करीत आहेत.