निऱ्हाळे : सिन्नर आगाराकडून सुरू करण्यात आलेली सिन्नर ते नांदूरशिंगोटेमार्गे निऱ्हाळा या मार्गावर नादुरुस्त बस पाठविण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एकच बस पाठविण्यात येत असल्याने ती सतत नादुरुस्त होत असते. परिणामी प्रवाशांना नेहमीच खोळंबा होत असल्याने निऱ्हाळेकर त्रस्त झाले आहेत. बस सायंकाळी ६.३० वाजता सिन्नरहून सुटते. ही बस गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू आहे. मात्र सिन्नर आगाराकडून व मुक्कामी बस (क्र. एमएच ४० ८५५९ ) ही बस गेली कित्येक वर्षे या मार्गावरून धावत आहे. ही एकमेव कायम असल्याने निऱ्हाळे, नांदूरशिंगोटे, दोडी, मानोरी, कणकोरी आदि गावांतील प्रवाशांना माहिती झाली आहे. सतत तीच बस असल्याने ती गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त होत आहे. सकाळी निऱ्हाळेहून साडेसहाला सुटणारी बस बंद पडल्यावर वाहक व चालक ती स्वत: दुरुस्त करतात. ती अर्ध्या तासाने सुरू झाल्यानंतर दोडी महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, तसेच मऱ्हळ बुद्रूक, मऱ्हळ खुर्द, कणकोरी, सुरेगाव, मानोरी, नांदूरशिंगोटे आदि भागातील प्रवाशांना घेऊन सिन्नरकडे निघते.मात्र एकमेव बस असल्याने ती नादुरुस्त झाल्यावर पर्यायी बसची व्यवस्था केली जात नाही असा आरोपही ग्रामस्थ व प्रवाशांनी केला आहे. सतत बंद पडणारी बस बदलून दुसरी बस देण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच सुभाष यादव, राजेंद्र वाघ, शांताराम केकाणे, संदीप देशमुख, ज्ञानेश्वर काकड, सोपान काकड, श्याम काकड, किशोर माळी, रानवसाहेब काकड, प्रकाश दराडे आदींसह ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे. (वार्ताहर)
सिन्नर आगाराच्या नादुरुस्त बसमुळे निऱ्हाळेकर त्रस्त
By admin | Published: June 17, 2014 12:27 AM