सिन्नर : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व दुरूस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. शहरातील बेकायदेशीर नळधारकांवर कारवाई केली जात नाही. नियोजनाचा अभाव असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजी नवले व संजय चव्हाणके यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शहरात होणाऱ्या विस्कळीत पाणीपुवरवठ्याबाबत अॅड. नवले व चव्हाणके यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात पालिकेच्या गलथानाकडे लक्ष वेधले आहे. पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाºयांसोबत शहरातील काही धनदांडग्यांनी बेकायदेशीर नळजोडण्या घेतल्या असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाणीपुरवठा करणाºया मुख्य वाहिन्यांवर नळजोडण्या असून नागरिकांनी आवाज उठवून देखील प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याचे कोणतेही वेळापत्रक पालिकेकडे नाही. काही भागात केवळ १० मिनीटे तर काही ठिकाणी २ तास नळांना पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून निघणाºया जलवाहिनीद्वारे १२-१३ तासांत टाकी भरली जाते असे पालिका सांगते. मात्र प्रत्यक्षात २० ते ३० तास लागतो. याचा अर्थ पाणीचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक नळ बंद करण्यात देखील अॅड. नवले व चव्हाणके यांनी लक्ष वेधले आहे. अनेक वर्षांपासून पाण्याचे आॅडिट झाले नाही. ते करण्यात यावे, पाण्याची सुव्यवस्थापन झाल्यास पाणीपुरवठ्यामागील अनाठायी खर्च होणार नाही याकडे लक्ष वेधत कडवा धरणातील पाणीपुरवठा योजना त्वरीत कार्यान्वित करावी व या योजनेचे देखील नियोजन करून शहरवासियांनी कृत्रिम पाणीटंचाईतून मुक्तता करावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.
नियोजनाअभावी सिन्नरला पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 2:56 PM