कार्यशाळेचे उदघाटन तहसीलदार राहुल कोताडे व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देणे, देशातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करून नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत स्टार्ट-अप धोरण २०१८ घोषित करण्यात आले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करणेसाठी नवसंकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही योजना महाराष्ट्र राज्यभर राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत तालुकापातळीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.जास्तीत जास्त गटांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करत लोणचे-पापड अशा पारंपारिक व्यावसायांतुन बाहेर पडून नवीन संकल्पना महिलांनी मांडाव्यात असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले तसेच ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसायांमध्ये नवीन कल्पना मांडू शकता असेही ते म्हणाले. कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून तालुका महिला व बालविकास अधिकारी भोये, उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक सुरज जाधव, शहर उपजीविका अभियान व्यवस्थापक अनिल जाधव तसेच माविम सिन्नरच्या प्रतिभा घंगाले, मानदेशी फौंडेशनच्या मनीषा भालेराव उपस्थित होते. सुरज जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर नावीन्यपूर्ण उपक्रम व नियोजन आराखडा या विषयावर अनिल जाधव यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. तालुका व्यवस्थापक कस्तुरा गवारे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उमेद अभियान व्यवस्थापक नितीन कापुरे व विजय कुटे उपस्थित होते.
सिन्नरला महिला बचत गट तालुकास्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 5:32 PM