पंचवटी : प्राचार्य सिन्नरकर महाराज यांचा विद्वत संन्यास ग्रहण दीक्षाविधी संन्यास व्रत सोहळा जून महिन्यात शुक्ल यजुर्वेदीय मंगल कार्यालयात होणार आहे.आद्य शंकराचार्य परंपरेतील दक्षिणस्थित शारदा पीठ शृंगेरी यांच्या परंपरेतील संकेश्वर पीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्या नरसिंह स्वामी हे स्वत: सिन्नरकरांना दीक्षा देणार आहेत. परमहंस परिव्राजकाचार्य दीक्षा ग्रहण सोहळा व उपाधी ग्रहण केली जाणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात प्रायश्चित विधानसभेत वेदोक्त याग नित्य होतील. यागाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न शांताराम भानोसे व त्यांचे सहकारी करणार आहेत. प्रथम दोन दिवस महाराज उपासना करतील व त्यानंतर एकादशीला सायंकाळी कार्यक्रमाला प्रारंभ होईल. त्यात नृत्य, कीर्तन, संगीत, एकपात्री नाटक कार्यक्रम होतील. शंकराचार्यकृत संन्यास सोहळा सुमारे शंभर वर्षांतून होत आहे. सिन्नरकर महाराजांनी ५५ वर्षांत १२ हजार कीर्तने केली असून, ती संपूर्ण राज्यात तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र व इंग्लंड, श्रीलंका, ब्रिटन या देशांतही इंग्रजी, हिंदीतून सादर केली आहेत. मंगळवारी (दि.२८) वसंत व्याख्यानमालेत नाशिककरांचा निरोप कीर्तनातील कार्यक्रम सांगता व संन्यास आश्रमात प्रवेश म्हणून कीर्तन समाप्ती सादर करणार आहे. या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन वृषाली सिन्नरकर तसेच सिन्नरकर महाराज शिष्यवर्गाने केले आहे.
सिन्नरकर महाराज घेणार संन्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:47 AM