नाशिक : आयोगाच्या तांत्रिक दोषामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट न होऊ शकलेल्या सिन्नरकरांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. १० सप्टेंबर रोजी ज्यांची मतदार यादीत नावे आहेत, अशांनाच नगरपालिका निवडणुकीत मतदान करता येईल, असे सांगत या संदर्भात सिन्नरप्रमाणेच कराड, सांगली, नांदगाव शहरवासीयांनी केलेल्या याचिकाही निकाली काढण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव, मनमाड या तीन शहरातील हजारो मतदारांची नावे आयोगाच्या तांत्रिक दोषामुळे मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नव्हती. या संदर्भात स्थानिक पातळीवर तक्रारी करूनही दखल न घेतली गेल्याने सिन्नरच्या दोघांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन १३८८ मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची विनंती केली होती. राज्यात नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला असल्याने त्यात मतदार यादीलाच हरकत घेणाऱ्या याचिका दाखल झाल्याने निवडणूक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत खोडा येतो की काय, अशी शंका घेतली गेली होती. तथापि, न्यायालयात या याचिकांच्या सुनावणीत निवडणूक आयोगाचे म्हणणे ग्राह्ण धरले. तांत्रिक दोष असो वा काहीही असो आयोगाने १० सप्टेंबर रोजी ज्यांची नावे यादीत आहे त्यांनाच मतदानाचा हक्क देण्याचा घेतला निर्णय वैध ठरविला. त्यामुळे सिन्नरसह कराड, सांगली, नांदगाव या शहरातील ज्या मतदारांची नावे १० सप्टेंबर रोजी यादीत नव्हती त्यांना नगरपालिका निवडणुकीत मतदान करता येणार नाही; मात्र त्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकांना त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे.
सिन्नरकरांची याचिका फेटाळली
By admin | Published: October 27, 2016 12:30 AM