सिन्नर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवक काँग्रेस वतीने येथे न्याय योजना राबविण्यात आली. ‘युवक काँग्रेस देगी एक दिन का न्याय, केंद्र सरकार दे अगले ६ माह का न्याय’ असे आश्वासन काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीर नाम्यात दिले होते. वार्षिक उत्पन्न १ लाख ४४ हजार पेक्षा कमी असलेल्या सर्व कुटुंबांना काँग्रेस सरकारकडून दरमहा सहा हजार रुपये (दोनशे रु पये प्रतिदिन) थेट बँक खात्यात जमा होतील अशी योजना आखली होती. मात्र केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार न आल्यामुळे न्याय योजनेची अंमल बजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिन्नर शहरातील गरजू लोकांना एक दिवसाचे रोख २०० रु पये देऊन त्यांना न्याय मिळवून दिला. असा एक दिवसाचा अनुभव साजरा करण्यात आला. युवक काँग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला पुढील सहा महिने ही योजना देशात लागू करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.
सिन्नरला युवक कॉँग्रेसतर्फे न्याय योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 9:51 PM