सिन्नर : युवा मित्र संस्थेने राबवलेला शेळीपालन प्रकल्प राज्यात इतरत्र राबविण्यात येईल. संस्थेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, सरकारतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. येथील शेळी संसाधन केंद्र व सावित्रीबाई फुले शेळी पालन उत्पादक कंपनीस भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.सिन्नर, संगमनेर, राहाता तालुक्यातील ८० गावांतून आठ हजार महिलांनी एकत्रित येत कंपनीची स्थापना केली आहे. आदिवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, शबरी वित्त व नितीन पाटील, सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर, युवा मित्र चे संस्थापक सुनील पोटे, मनीषा पोटे, मनीषा वेलजाळी आदी उपस्थित होते. संपूर्णपणे महिलांमार्फत चालविल्या जाणाऱ्या कामकाजाची पाहणी करून पाडवी यांनी समाधान व्यक्त केले. शेळीपालन हा ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारा व्यवसाय आहे. शेळी पासून मिळणारे उत्पन्न हे महिलांचे हक्काचे उत्पन्न आहे. असा प्रकल्प राज्यात इतरत्रही राबवला जाईल. संस्थेने त्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारकडून सर्व ते सहकार्य करण्यात येईल असे पाडवी यावेळी म्हणाले.
सिन्नरचा शेळीपालन प्रकल्प राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:17 PM