सिन्नर : गेल्या आठवड्यात गुरूवारी (दि.१६) सरदवाडी रस्त्यावरील साई समृद्धी अपार्टमेंटमधील सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे ५५ हजार रूपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली. सकाळी ९.३० ते रात्री १२.३० या वेळेत हा प्रकार घडला असून यामुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. संदीप भगवान पाटील हे साई समृद्धी अपार्टमेंटमधील सदनिका क्रमांक ७ मध्ये वास्तव्याला आहेत. गुरुवारी (दि.१६) रोजी सकाळी घराचा दरवाजा बंद करून ते कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरटयांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे २९,५०० रुपये किमतीचे दागिने व २५ हजार रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. रात्री उशिरा घरी आल्यावर पाटील यांना दरवाजा उघडा दिसला व घरातील सामानाची उचकपाचक केल्याने आढळून आले. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत घटनेची पाहणी केली. अज्ञात चोरट्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नरला घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:03 PM