सिन्नर: अखिल भारतीय विडी कामगार फेडरेशनच्या आदेशानुसार व महाराष्टÑ राज्य विडी कामगार फेडरेशन यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सिन्नर तालुका विडी कामगार संघाने (आयटक) येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन दिले. आयटकचे राज्य सचिव राजू देसले, आयटकच्या उपाध्यक्ष ज्योती नटराजन, सिन्नरचे जनरल सेक्रेटरी नारायण आडणे, रेणुका वंजारी यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी दुपारी येथील कामगार चौकात विडी कामगार संघाच्या कार्यालयासमोर शेकडो विडी कामगार व महिला एकत्र आल्या. विविध घोषणा देत नवापूल, गणेशपेठ, सिन्नर मेडीकल, पोस्ट आॅफीस, हुतात्मा चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसील कार्यालयाच्या प्रागंणात छोटेखाणी सभा झाली. नारायण आडणे यांनी प्रास्ताविक केले. राजू देसले, ज्योती नटराजन, रेणुका वंजारी यांनी विडी कामगारांना मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसीलदार राहुल कोताडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्यातील शेकडो विडीकामगार सहभागी झाले होते. चौकट-या आहेत मागण्या..कमीत कमी ९ हजार रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता लागू करावा, धुम्रपान विरोधी कायद्यानुसार तंबाखू व विडी धंद्याला वगळून विडी धंद्याला देशपातळीवर संरक्षण द्यावे, ८५ टक्के हेल्थ वार्निंगची विडी बंडलावरचे धोका चित्र छापण्याची अट शिथील करावी, २८ टक्के जीएसटी कर कमी करुन तो ५ टक्के करावा आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन दिले.
सिन्नरला विडी कामगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 4:22 PM