: येवल्यात मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजन
येवला : सर, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, तुम्ही मला मागणी पुरवठ्याचं अर्थशास्त्र शिकवलं; पण भाकरीचं अर्थशास्त्र शिकवलंच नाही ...
अशा सामाजिक आशयाची कविता विद्राेही कवी शिवाजी भालेराव यांनी येथील मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित माझी कविता - काव्यमाला या ऑनलाइन काव्यमालेत म्हटली.
भालेराव यांनी दिंडी निघणार आहे, या काव्यसंग्रहातील कळप, हत्येचा इतिहास, कुपोषित बालकांनो, दिंडी निघणार आहे, सर तुम्ही मला हे शिकवलंच नाही या सामाजिक आशयांच्या पाच कवितांचे काव्य वाचन करत कवितेच्या मुलार्थावर भाष्य केले.
वास्तव जीवन आणि शिक्षण यातील भेदावर भाष्य करताना कवी भालेराव म्हणतात
सर, हत्येचा इतिहास या कवितेची मांडणी करताना
दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या झाली, याचे मला नवल वाटले नाही; कारण,
प्रचलित व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणाऱ्या सुधारकांच्या हत्या इतिहासाला नव्या नाहीत... म्हणत
कपिल चार्वाक, कबीर, चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखा, जॉन विक्लिफ, जॉन हस, झ्विगंली, कोपर्निक्स, गॅलिलिओपासून तर फुले, आंबेडकरांपर्यंत दाखले देत समाज परिवर्तनाची मांडणी करणाऱ्या या सुधारकांचा छळ तर अनेकांच्या हत्या या तत्कालीन व्यवस्थेने केल्या आहेत. या वास्तव कवितेने रसिकांना इतिहासाचे अवलोकन करायला भाग पाडले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केले तर कवीचा परिचय परिषदेचे खजीनदार प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी करून दिला. कार्यक्रमाचा समारोप कवी लक्ष्मण बारहाते यांनी केला.
कवितेचा कवीला अपेक्षित असणारा अर्थ कवितेची पार्श्वभूमी वेगळी असते तर वाचकाला समजलेली कविता यात बऱ्याचदा अंतर पडते. कवीने जगलेली कविता वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी साहित्य परिषदेने दर शनिवारी सायं. ७ वाजता झूम ॲपवर ऑनलाइन काव्यमाला आयोजित केली आहे.
------------------
दिंडी निघणार आहे या विद्रोही कवितेवर भाष्य करताना भालेराव म्हणतात, भक्ती, मुक्ती, श्रद्धेच्या पोटी दैव, प्रारब्धावर विश्वास ठेवत आपलं दु:ख, दैन्य, दारिद्र्य संपवण्यासाठी कष्टकऱ्यांच्या दरवर्षी निघणाऱ्या दिंड्या या पंढरपूर ऐवजी सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्लाबोल नामाचा गजर करत निघाल्या पाहिजे, अशी विद्रोही मांडणी भालेराव यांनी केली.