नाशिक : शहरातील नागरिकांची कोरोना संसर्गाच्या विरोधात लढण्याची प्रतिकारक्षमता तपासण्यासाठी महापालिकेने शहरातील अडीच हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासणीचे काम पूर्ण केले. सर्व रक्तनमुने मुंबईच्या एका प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तेथून अहवाल आल्यानंतर डॉ.जगन्नाथ दीक्षित हे त्याचे विश्लेषण करणार आहे. त्यातून सामूहिक प्रतिकारशक्ती कितपत विकसित झाली आहे, हे स्पष्ट हेाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असताना, राज्य शासनाच्या आदेशानुसार शहराच्या विभागात शास्त्रोक्त सिरो टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, शनिवार ते सोमवार अशा तीन दिवसांत विविध भागांत आणि विविध स्तरावर या चाचण्या करण्यात आल्या. पहिल्या दिवशी १ हजार ६७ नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी २,२४५ तर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी उर्वरित सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली या सर्वेक्षणाचे शास्त्रोक्त नियोजन करण्यात आले होते. महापालिकेने चाळीस पथके तयार केली होती, तसेच ठरावीक भागात नागरिकांची पूर्वसंमती घेऊन रक्तनमुने घेण्यात आले.
महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार, मुंबई येथील एका प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात आले आहेत. तेथून तीन दिवसांनी त्याचे अहवाल मिळेल. यामुळे रक्तनमुने घेतलेल्या नागरिकांच्या शरीरात किती प्रमाणात प्रतिपिंड तयार आहेत आणि त्यातून किती प्रमाणात सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, ते स्पष्ट होईल. अहवाल मिळाल्यानंतर या संदर्भातील विश्लेषण डॉ.जगन्नाथ दीक्षित करणार आहेत, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.