देवळा : तालुक्यातील दहीवड येथे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने शवविच्छेदन अहवालानंतर वेगळे वळण घेतले आहे. सख्ख्या भावानेच बहिणीचा खून केल्याचे निदर्शनास आले असून, ही आॅनर किलिंगची घटना असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मयत तरुणीचा भाऊ रोशन सोनवणे यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा दिवसांत गुन्हा उघडकीस आला आहे.प्रियंका निंबा सोनवणे ( १९, रा. भौरी शिवार) या तरुणीने शुक्रवारी (दि. ७) घरातील पाइपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.अशी माहिती तिचा भाऊ रोशन याने नातेवाइकांना सांगितली होती. त्यावेळी प्रियंकाचे आईवडील हे भावकीतील नातेवाइकाच्या रक्षा विसर्जनासाठी गेले होते. घरात रोशन व प्रियंका हे बहीण भाऊ दोघेच होते. प्रियंकाच्या कुटुंबीयांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली असता सदरची बाब पोलीसपाटील मधुकर शिंदे यांना समजताच त्यांनी पोलिसांना त्याची खबर दिली. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी त्वरित पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अंत्यसंस्काराची तयारी झालेला प्रियंकाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला व घटनेची चौकशी सुरू केली असता घरातील एकंदर वस्तुस्थिती, मयताच्या अंगावरील जखमा व रोशन सोनवणे याने सांगितलेली हकिगत याचा कोठेही मेळ बसत नसल्याचे दिसून आले. नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रु ग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रियंकाचे शवविच्छेदन करण्यात आले असता अहवालात प्रियंकाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या तसेच तिचा मृत्यू गळा आवळून श्वास गुदमरून झाल्याचे आणि तिला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या दिशेने तपास सुरू केला असता पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. अमोल व प्रियांका यांच्या प्रेमसंबंधास कुटुंबीयांचा प्रखर विरोध होता. तरीही प्रियांकाने प्रेमविवाह केला ही बाब त्यांना मान्य नव्हती. नातेवाइकात आपली बदनामी होईल या धास्तीने आईवडील घरात नसल्याचे पाहून प्रियंका हिस गळ्याला साडी काठाच्या दोरीने आवळून ठेवल्याने त्यात प्रियंका ही मरण पावल्याची माहिती रोशनने दिली. देवळा पोलिसात संशयित आरोपी रोशन निंबा सोनवणे (वय २१) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन सोनवणे यास गुरुवारी (दि. १३) कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला दि. १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.रोशनकडून कबुलीमयत प्रियंका हिचा कळवण येथील आपल्या नात्यातील अमोल अहेर नावाच्या तरुणाशी नाशिक येथे वैदिक पद्धतीने सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.पोलिसांनी अमोलशी संपर्कसाधला असता त्याने प्रियंकाशी प्रेमसंबंध असल्याचे व त्यांनी विवाह केल्याचे मान्य करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र दाखविले.निरीक्षक सपकाळे यांनी मयताचे नातेवाईक, रोशन यांच्याकडे विचारपूस केली असता विसंगत माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तपास पथकाने रोशनला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सख्ख्या भावानेच केला बहिणीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 2:04 AM
देवळा तालुक्यातील दहीवड येथे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने शवविच्छेदन अहवालानंतर वेगळे वळण घेतले आहे. सख्ख्या भावानेच बहिणीचा खून केल्याचे निदर्शनास आले असून, ही आॅनर किलिंगची घटना असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ठळक मुद्देआॅनर किलिंग : संशयित आरोपीस पोलीस कोठडी