नाशिक : बंधू-भगिनींनो अशी कोणी सुरुवात केली की, अनेकांना भरते येते परंतु येथे एक दादा (लोक त्यांना अण्णा नावाने ओळखतात) ते आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक राजकीय महिलेला दीदी म्हणतात अशा भाऊरायाने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीची वेडी माया लक्षात न घेता राखी बांधण्यासाठी टाळावे किंबहूना भ्रमणध्वनीही घेऊ नये याला काय म्हणावे? निवडणुका येतात-जातात, म्हणून काय भातृप्रेमाची अशी ‘सीमा’ ओलांडावी...?निवडणुका आल्या की, कोणीही इच्छुक कोणाला मामा, काका, दादा म्हणतात आणि राजकारण सरले की नंतर कालांतराने विस्मरणही होऊन जाते. परंतु ताई- दादाचे म्हणजेच बहीण-भावाच्या नात्याचे तसे नाही. इतिहासातील अनेक राजांनीदेखील केवळ राखीचे नाते म्हणून महिलांना मदत केली आहे. चितोडगडच्या महाराणी कर्णावती यांनी हुमायुॅँला राखी पाठवून मदतीची याचना केली आणि त्यांनीही सुलतान बहादूर शहापासून भगिनीचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पाठवून दिले, असा प्रेरणादायी इतिहास आहे. भलेही राजकारण बदलते असेल, परंतु नाते थोडे काबदलते?अण्णा तर सर्वच महिलांना दीदी म्हणत असल्याने विश्वबंधू भाजपात त्यांच्या तीन प्रमुख ताया (म्हणजे ताई) त्यातील महापौर रंजना भानसी यांची तर या बंधूचे (अलीकडेपर्यंत) खूप जमत असे. महापौर म्हणजे सर्वांत लाडकी दीदी. मध्य नाशिकमधील दीदीबाबत अण्णांनी तसे सुरक्षित अंतर राखलेले. परंतु धाकल्या सीमा दीदीविषयी बोलायचे तर अंतरच अंतर राखलेले. नाते आहे, पण भाऊबंदकीचे! ताईने केलेले राजकारण, भाच्याचा झालेला पराभव अशा अनेक भाऊबंदकीच्या कटू आठवणी अण्णांना सतत बोचत असाव्यात. त्यामुळे राजकीय भाऊबंदकी वाढली आणि मग मोठ्या बंधूनेदेखील विधानसभेतील खुर्चीची ऊब राखवायचे ठरले.त्यात अडसर दीदीचा. त्यामुळे दोघांत फारसे संभाषण नसतेच. परंतु तरीही महापौर दीदी आणि सीमा दीदींनी आवर्जून लाडक्या भावाची रक्षाबंधनाची आठवण ठेवून आवर्जून फोन केला. त्यातील महापौर दीदीशी आता अंतर पडल्याने अण्णांनी रामायणकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापौर दीदीने स्वत:हून गेल्या दोन वर्षांतील नातेसंबंध आणि संकटप्रसंगी अनुभवलेला संघर्ष, दोघांनी मिळविलेला विजय याची आठवण करून दिली. किमान या दीदीशी बोलून अण्णांनी मनातील सल व्यक्त केली खरी, परंतु दुसºया दीदीचा साधा फोनही उचलला नाही.राजकीय वर्तुळात यामुळे चर्चा झाली. बहिणीची वेडी माया भाऊरायाला कळली नाही, असेही काही जण म्हणू लागले. परंतु भाऊरायाच्या मनातील सल आणि इच्छा तरी भगिनींना उमजेलकाय?
बहिणीची वेडी माया, भाऊरायाला नाही दया माया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:50 AM