नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना काळात घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये विद्यार्थांना वेगवेगळया तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला असून, आता या परीक्षांचे निकालही विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत. कोरोना काळात घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, अनेक विद्यार्थी गैरहजर तर काहींना शून्य गुण मिळाल्याचे निकाल हाती पडल्याने विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने विद्यापीठाच्या उपकेंद्र कार्यालयात सोमवारी (दि.७) ठिय्या आंदोलन करीत संबंधित विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील अर्थशास्त्रच्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. या विषयाचा निकाल सुधारित पद्धतीने जाहीर, अशी मागणी अभाविपतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र समन्वयकांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या. त्यात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. २० ऑक्टोबरला झालेल्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेतही असाच गोंधळ झाला आहे. या परीक्षेेसाठी बेससाइटवर लॉगइन करण्यात विद्यार्थ्यांना अथडळे आलो होते. उशिराने लॉगइन होणे व आपोआप लॉगआउट होणे, पुन्हा लॉगइन केल्यानंतर उत्तरांचे क्रम बदलणे, उशिरा लॉगइन झाल्यामुळे कमी वेळ मिळणे यांसह विविध समस्यांचा सामना करीत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर झाला असून, उपस्थित विद्यार्थी अनुपस्थित दाखवणे, शून्य गुण मिळणे यांसह अनेक त्रृटी निकालात दिसूत येत आहे. त्यामुळे या विषयाचा निकाल सुधारित पद्धतीने जाहीर करावा व ज्या तांत्रिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे क्रम बदलले असतील त्यांची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी अभाविपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी अभाविपचे महानगर सहमंत्री राकेश सांळुके, प्रदेश सहमंत्री विराज भामरे, अथर्व कुळकर्णी आदींनी आंदोलनात सहभाग घेत उपकेंद्र समन्वयकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.
(फोटो-०७ पीएचडीसी ६५)