नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून लाखो रुपयांचे अनुदान मिळूनही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी थेट आदिवासी विकास भवन गाठत तेथे ठिय्या आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे आदिवासी विकास भवनातील प्रशासनाचे धाबे दणाणले. या आंदोलनाची दखल घेऊन नाशिक विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शाळेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगास खिंड येथे शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल नावाची आश्रमशाळा असून नामांकीतमध्ये गणल्या जाणाऱ्या या शाळेस आदिवासी विकास विभागाच्यावतीने मोठ्या प्रमाणात आर्थिक अनुदान दिले जाते. मात्र, शाळेने अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केलेले नाही. शाळेमध्ये मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते. आदी विविध तक्रारी असून या शाळेची चौकशी करण्याची मागणी करत शाळेतील विद्यार्थी व पालकांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली पायी चालत थेट आदिवासी विकास भवनात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अचानक आलेल्या या आंदोलनामुळे नाशिक प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. नाशिक विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी आंदोलकांना सामोरे जात त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकांनी संबंधित शाळेची चौकशी करण्याची मागणी केली. पालकांचा आक्रमक पवित्रा पाहता अपर आयुक्तांनी शाळेच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती शाळेवर कारवाई करण्याचे अश्वासन यावेळी अपर आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.
कोट-
आगासखिंड येथील शाळेची चौकशी करण्याची करण्याचे आदेश देण्यात आले असून यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पालक आणि आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यांचे म्हणने ऐकून घेतले आहे. शाळेविषयी पालकांनी गंभीर तक्रारी केल्या असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- संदीप गोलाईत , अपर आयुक्त , नाशिक विभाग
चौकट-
आदिवासी विकास विभागाच्या नामांकित शाळांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला . या शाळेसंबंधी महिनाभरापूर्वीच संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले होते मात्र, त्याची दखल न घेतली गेल्याने संतप्त पालकांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केले.