सातपूर : दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ सिटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली होती. पंजाब आणि हरियाणातून शेतकरी मोठ्या संख्येने राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यासाठी धडकले होते. दिल्ली पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने परिस्थिती चिघळली. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू झाला. शेतकऱ्यांवर पोलिसांनी दडपशाही केल्याच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सीटू भवनासमोर भारतीय ट्रेड इंडियन्स केंद्र (सीटू) च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सीटूचे डॉ. डी. एल. कराड, राज्य उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, मोहन जाधव, गौतम कोंगळे, विजया टिक्कल, निवृत्ती केदार आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.