घोटी : देशाचे हित साधताना कुठ गेला कामगार कायदा, कुठ गेला स्वामिनाथन आयोग यापुढे भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी व शासकीय ठिकाणी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घ्यावे अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे यांनी घोटी टोलप्लाझा जवळ मोर्चा काढुन मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको दरम्यान सरकारला दिला.भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवार ( ८ ) दुपारी बारा वाजता शहरातून सिटूच्या वतीने मोर्चा काढत काही काळ मुंबई नाशिक महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मोर्चेकऱ्यांनी निवेदन देताच पोलिसांनी तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.घोटी शहरातील बँक आॅफ इंडिया कार्यालयापासून अकरा वाजता मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात सहभागी कामगार, शेतकरी, शेतमजुरांनी विविध घोषणांचे फलक हातात घेत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी शहा हटाव, देश बचाव, कामगार एकता जिंदाबाद, शेतकरी एकजुटीचा विजय असो आदि घोषणाबाजीने शहर व परिसर दुमदुमून गेला होता. या मोर्च्यात आशा कर्मचा-यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. सिटूच्या वतीने प्रथमच सर्वच स्तरातील नागरिकांसमवेत भुतोनभविष्यती असा मोर्चा काढण्यात आला.यावेळी सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे, सिटूचे जिल्हा सेक्र ेटरी चंद्रकांत लाखे, कामगार नेते कांतीलाल गरूड,तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, शिवराम बांबळे, विश्वास दुभाषे, रवींद्र गतीर, निवृत्ती कडू, सदाशिव डाके, आप्पा भोले, निलेश बोराडे, मनोज भोर यांसह मोठ्या प्रमाणात मोर्च्यात शेतकरी, कामगार, घरकामगार, बेरोजगार तरु ण सहभागी झाले होते.
घोटी महामार्गावर सीटूचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 3:05 PM