ट्रॅकवर वाढले जाॅगर्स
नाशिक : शहरातील विविध परिसरांमधील जॉगिंग ट्रॅकवर जॉगर्सच्या संख्येत वाढ झाली असून, सकाळबरोबरच सायंकाळीदेखील नागरिक आता जॉगिंगसाठी बाहेर पडू लागले आहेत. पावसानेदेखील आठवडाभरापासून विश्रांती घेतल्याने जॉगर्सच्या उत्साहात भर पडली आहे.
मोबाइल अतिवापराने नेत्रविकाराची भीती
नाशिक : कोरोनानंतर सध्या शाळा सुरु असल्याने बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या मदतीने शिक्षण घेत आहेत; परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
रविवारी पर्यटकांची गर्दी
नाशिक : शहर परिघाबाहेरील निसर्गरम्य स्थानांवर छोटी सहल काढणाऱ्या चारचाकी चालक, दुचाकी चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी अशा प्रकारे गर्दी होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोना गेलेला नसूनही अनेक जण कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
मोकाट श्वानांकडे दुर्लक्षामुळे नाराजी
नाशिक : शहरातील शालिमार, गंजमाळ, सारडा सर्कल परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काही वेळा वाहनांच्या पाठीमागे धावतात. यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते. काही वेळा यामुळे दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत.
रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
नाशिक : पाथर्डी फाटा ते द्वारका परिसरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहन आदळून वाहनाचेही नुकसान होते. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.