नाशिक : जुने नाशिक व सिडको परिसरातील दोघांचा ‘स्वाइन फ्लू’सदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली़ यामध्ये एक ज्येष्ठ नागरिकाबरोबर एका सातवर्षीय मुलाचा समावेश आहे़ दरम्यान, या घटनेमुळे शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे़ शिवाजी चौकातील रहिवासी जगदीश वसंत खैरनार (५८) यांचे स्वाइन फ्लूसदृश आजाराने सोमवारी निधन झाले़ मुंबईच्या केईएम हॉस्पिटलने दिलेल्या वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये मृत्यूचे एक कारण स्वाइन फ्लू म्हटले आहे़ खैरनार यांच्या निधनाने सिडकोत स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला आहे़ त्यामुळे नवीन नाशिक परिसरात घबराट पसरली आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आलेला दहीपूल येथील दर्शन प्रकाश सूर्यवंशी या सातवर्षीय मुलाचा न्युमोनियाने मृत्यू झाला़ दर्शनला दुपारपासूनच जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या़ जर त्यास न्यूमोनिया होता तर स्वाइन फ्लू कक्षामध्ये का हलविले जात होते़ तसेच या ठिकाणी सहा रुग्ण उपचार घेत असल्यामुळे व तेथे जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यास आपत्कालीन विभागात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूसदृश आजाराने शहरात दोघांचा मृत्यू सिडकोतील ज्येष्ठ नागरिक व दहिपुलावरील लहान बालकाचा मृत्यू
By admin | Published: February 18, 2015 12:21 AM