नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर महापालिकेने धडक कारवाई सुरू केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत ६ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. शुक्रवारी एका दिवसात दीड लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे. शहरात कोरेेानाबाधितांची संख्या १० फेब्रुवारीनंतर वाढत गेली आहे आणि सहाशेवरून थेट १७०० रुग्ण शहरात उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारी (दि. २१) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना संदर्भातील टास्क फेार्सची बैठक घेतली होती. त्यात नागरिकांना आरोग्य नियमांचे पालन सक्तीने करण्यासाठी प्रवृत्त करावे त्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करावी, अशी सूचना केली होती. मास्क न घालणाऱ्यांना दोनशे रुपयांचा दंड केला जातो. मात्र, तो आता एक हजार रुपये करण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठीदेखील एक हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सोमवारी शहरात दोनशे रुपये प्रति व्यक्ती असेच दंड करण्यात आले, नंतर सोमवारी (दि.२२) आयुक्त कैलास जाधव यांनी साथ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून मास्कचा वापर न करणाऱ्या, तसेच सर्वच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात २२६ जणांना दंड करून ५० हजार हजार रुपये जमा झाले होते. त्यानंतर मात्र आकडा वाढत गेला आणि २३ फेब्रुवारीस १ लाख २७ हजार रुपये दंड करण्यात आला. अशाच प्रकारे दंडात वाढ होत गेली आणि शुक्रवारी (दि. २६) १५० जणांकडून १ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
इन्फो..
तारीख प्रकरणे दंड
२३ फेब्रुवारी १२७ १ लाख २७ हजार रुपये
२४ फेब्रुवारी १८३ १ लाख ८३ हजार रुपये
२५ फेब्रुवारी १२६ १ लाख २६ हजार रुपये
२६ फेब्रुवारी १५० १ लाख ५० हजार रुपये