मनपाची सहा वर्षांतील कारवाई : तीन कोटींची वसुली बाकी
नाशिक : महापालिकेने घंटागाडी ठेकेदारांना विविध तक्रारी आणि त्रुटींवरून सन २०१२-१३ पासून सहा वर्षांत ५ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील २ कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सद्यस्थितीत पंचवटी व सिडकोतील ठेकेदारांकडून २ कोटी ८४ लाख रुपये दंडाची वसुली अद्याप बाकी आहे. महासभेत भाजपाच्या सदस्या वर्षा भालेराव यांनी विचारलेल्या प्रश्नावर आरोग्य विभागाने घंटागाडी ठेकेदारांच्या दंडाचा तपशील दिला आहे. त्यात सन २०१२-१३ ते ३० जून २०१७ पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. घंटागाडी वेळेत न जाणे, कर्मचाºयांचे वेतन थकविणे यांसह विविध कारणांमुळे ठेकेदारांना दंड ठोठावला आहे. सहा वर्षांत नाशिक पूर्वमधील ठेकेदाराकडून ३५ लाख ५० हजार रुपये, पंचवटीतील ठेकेदाराकडून ९७ लाख ६० हजार, नाशिकरोडमधील ठेकेदाराकडून ९ लाख ८४ हजार, सातपूरच्या ठेकेदाराकडून ३४ लाख १८ हजार, पश्चिम विभागातील ठेकेदाराकडून १७ लाख ५ हजार तर सिडकोतील ठेकेदाराकडून १ लाख ४ हजार याप्रमाणे एकूण २ कोटी ९८ लाख ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक दंड हा सिडकोतील ठेकेदाराला तर सर्वात कमी दंड नाशिकरोडच्या ठेकेदाराला झालेला आहे. एका ठेकेदाराला तीन कोटी दंडमहापालिकेने पाच वर्षांकरिता नव्याने घंटागाडीचा ठेका दिला आहे. सदर ठेका देताना ठेकेदारांना नवीन घंटागाड्या खरेदी करण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार, पंचवटी व सिडको वगळता अन्य विभागात जुन्याच ठेकेदारांना ठेका मिळाल्याने त्यांनी नवीन गाड्यांची पूर्तता केली परंतु, पंचवटी व सिडकोतील ठेकेदार पूर्तता करण्यात मागे पडला. त्यामुळे सदर ठेकेदाराला वेळेत वाहने न लावणे व निविदा अटीशर्ती जीपीएस प्रणालीनुसार २ कोटी ८४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, अद्याप सदर ठेकेदाराकडून दंड वसूल झालेला नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.