वावी : सिन्नर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वावी गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने सहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा दिवस जनता कर्फ्यू म्हणून सर्वांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या छोटेखाणी बैठकीत घेण्यात आला.
गेल्या आठ दिवसांत वावी व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर), सदस्य प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव, रामराव ताजणे, कैलास जाजू, नवनाथ काटे, सचिन वेलजाळी, ज्ञानेश्वर खाटेकर, प्रदीप मंडलिक यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी व ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक सेवा बंद ठेवून केवळ रुग्णालये व औषधे दुकाने सुरू ठेवण्यावर बैठकीत एकमत झाले. अनेकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सूचना केल्या. त्यातून येत्या गुरुवार (दि. २२) पर्यंत पूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नियम मोडण्याऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस विजय सोमाणी, गणेश वैराळ, हनुमान वाजे, भाऊराव संधान, फरीद आत्तार, अनंत मालपाणी, संतोष जोशी, रामेश्वर जाजू, गणेश वेलजाळी, जयेश मालपाणी, अण्णा यादव, योगेश पाचपाटील, आशिष माळवे, मंदार केसकर, गोविंद माळवे, संजय देशमुख, संजय भोसले, साईनाथ पठाडे, दीपक घेगडमल यांच्यासह व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------------
अवैध व्यवसाय तेजीत असल्याची तक्रार
वावी गावात प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कडक निर्बंध लावले जात असताना दारू व अन्य अवैध व्यवसाय तेजीत सुरू असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली. अनेक गल्लीबोळात देशी दारूची चढ्या दराने विक्री होत असल्याचीही तक्रार यावेळी करण्यात आली. प्रामाणिक काम करणाऱ्या व्यावसायिकांना बंदी आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा धंदा तेजीत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
----------------------
चढ्या दराने विक्री करण्यांवर कारवाई करा
गावात किराणा व अन्य काही माल चढ्या दराने विक्री केला जात असल्याच्या तक्रारीही बैठकीत करण्यात आल्या. त्यावर दुकानदारांनी जनता कर्फ्यू संपल्यानंतर दुकानाबाहेर भावफलक लावावेत अशी सूचना माजी सरपंच विजय काटे यांनी केली. बाजारभावापेक्षा जास्त किंमत लावून सर्वसामान्यांची लूट होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
------------------
गावाच्या सीमा सील करण्याचे काम युद्धपातळीवर
वावी येथे सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार (दि. २३) रोजी एक दिवस गावात जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येऊन पुन्हा शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे गावात ये-जा करण्यास या काळात मनाई करण्यात आली आहे. संसर्ग टाळण्यासाठी बाहेरून कोणी आत येऊ नये आणि कोणी बाहेर जाऊ नये यासाठी गावाच्या सीमा सील करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यास प्रारंभ करण्यात आला.