मातोरी : ग्रामीण भागातील जनतेच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ‘रेड झोन’मध्ये असलेल्या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली असली, तरी मृत्यूंचे प्रमाण कायम आहे. मातोरी गावात कोरोनामुळे आजवर सहाजणांचा मृत्यू झालेला असताना राज्य सरकारच्या दफ्तरी मात्र एकच मृत्यू दाखविण्यात आल्याने आकडेवारीच्या या गौडबंगालाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. मातोरी गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, ग्रामपंचायत पातळीवर कोरोना रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असताना दोन आठवड्यांपूर्वी गावात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यातून काही प्रमाणात कोरोनाला आळा बसण्यास मदत झाली असली, तरी नाशिक शहराशी मातोरीकरांचा जवळचा संबंध येत असल्याने पाहिजे त्या प्रमाणात रूग्णसंख्या कमी झाली नाही. मातोरी गावात आजवर एकूण सहाजणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, तशी नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या दफ्तरी एकाच रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. शेजारील मुगसरे गावातील ग्रामपंचायत अहवाल आणि शासकीय अहवालातही मोठी तफावत दिसून आली. आरोग्य खाते मृत्यूंची माहिती दडवत असल्याचे दिसून येत आहे.
मातोरीत सहाजणांचा मृत्यू, नोंदणी मात्र एकाचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:14 AM