सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खुटवडनगर ते आयटीआयपूल दरम्यानचा रस्ता तसेच परिसर वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यापाठोपाठ सोमवारी प्रभाग क्रमांक २५मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. या तपासणीत सहाजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत.सिडको परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर अनेक उपाययोजना केल्या जात असून, कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबरच आता नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. सोमवारी नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांनी त्यांच्या प्रभाग २५ मध्ये परिसरातील नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत महापालिका प्रशासनातील डॉक्टर तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी याची सुरुवात पाटीलनगर भागातून करण्यात आली. यावेळी प्रत्येक नागरिकांच्या घरात जाऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात नागरिकांचे तापमान तसेच आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. तपासणीत सुमारे २५हून अधिक नागरिकांची संशयित कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील सहा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने मनपाने त्यांना उपचारार्थ हलविले.-----------------प्रभागात वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, यावर उपाय म्हणून प्रभागातील प्रत्येक नागरिकाची प्राथमिक तपासणी मोहीम हाती घेतली असून, पाटीलनगर येथून सुरुवात केली आहे. ही मोहीम संपूर्ण प्रभागात राबविण्यात येईल.सुधाकर बडगुजर, नगरसेवक
------------------सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, आयुक्तांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे संसर्ग कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.-डॉ. दीपिका मोरे,आरोग्य अधिकारी मनपा सिडको