मालेगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर तालुक्यातील दाभाडी शिवारातील रोकडोबा मंदिर फाट्याजवळ इंडिका व अॅपेरिक्षा यांच्यात अपघात होऊन दोन बालकांसह सहाजण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दाभाडी परिसरात असलेल्या रोकडोबा मंदिर फाटा व गिरणा कारखाना फाटा या दरम्यान दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सटाण्याकडे जाणाऱ्या इंडिका कारने (क्र. एमएच १७ एई १३११) ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून भरधाव येणाऱ्या अॅपेरिक्षाला (क्र. एमएच ४१ सी ४१०४) धडक दिली. (पान ७ वर)धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा हवेत पाच फूट उंच उडून फेकली गेल्याने तुकडे तुकडे झाले. यावेळी झालेल्या आवाजाने परिसरातील शेतकरी जमा होऊन त्यांनी जखमींना बाहेर काढले.या अपघातात दोन लहान मुले, एक महिला व तीन पुरुष ठार झाले. यात सचिन रवींद्र पटाईत (४), सुशांत रवींद्र पटाईत (२) रा.दोघे चंद्रमणीनगर, द्याने (मालेगाव), पवन नाना सावंत (२४) रा. आर्वीपूर, अॅपेरिक्षाचालक राजेंद्र रतन शिंदे (२५), रा. इंदिरानगर, दराणे (सटाणा) या चौघांसह एक सुमारे ५५ वर्षीय महिला (ओळख पटलेली नाही) आणि एक २२ वर्षीय तरुण (अनोळखी) यांचा समावेश आहे. या अपघातात अॅपेरिक्षातील साई पवन सावंत (२), धनश्री पवन सावंत (२१) दोघे रा. आर्वीपूर (धुळे), पूनम रवींद्र पटाईत (२२) रा.चंद्रमनीनगर, द्याने (मालेगाव), अमृता शरद बिरारी (३१) रा. नामपूररोड, मालेगाव, मंडाबाई खरे (५५) रा. जळगाव चोंढी (मालेगाव), कमळाबाई सुनील रेडकर रा. शिवाजीनगर, मालेगाव कॅम्प तर इंडिका कारमधील दत्तू अण्णा शेळके, रा. लखमापूर व बाजीराव नथू लांडगे, रा. धांद्री हे आठ जण जखमी झाले. या जखमींवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. यातील ५५ वर्षीय मयत महिला व २२ वर्षीय तरुण यांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. तरुणाच्या खिशात पोलिसांना धरणगाव येथील बसच्या तिकिटाशिवाय दुसरे काहीही मिळून आले नाही तर मयत महिलेबरोबर तिचा लहान नातू आहे. हा लहान मुलगा घाबलेला असल्याने माहिती सांगण्याच्या परिस्थितीत नाही.
मालेगावजवळ अपघातात सहा ठार, आठ जखमी
By admin | Published: May 23, 2016 11:18 PM