दिंडोरी/वणी : वणी-कळवण रस्त्यावरील मार्कंडेय पर्वताजवळील मुळाणे घाटात गुरुवारी (दि.२) सायंकाळी ट्रॅक्टरसह असलेली ट्राॅली एका कारवर जाऊन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कार व ट्रॅक्टर-ट्राॅलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालासह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉलीतून प्रवास करणारे सर्व मजूर असून ते जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर (ता. दिंडोरी) येथून कनाशीकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. रस्त्याचे कामासाठी जाणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्राॅली घाटात उलटली. ती एका कारवर जाऊन आदळली. ट्राॅलीत असलेल्या १७ जणांपैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस तसेच आसपासच्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे सर्व मजूर जळगांव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत तर काही गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर-ट्राॅलीखाली कार दबली गेली होती. ट्राॅलीतील मजुरांचे सारे संसारोपयोगी साहित्य इतस्तत: विखुरले होते. या वेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तर मदतकार्यात स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस गुंतले होते.
या अपघातात वैशाली बापू पवार (४), सरला बापू पवार (४) रा. उंदीरखेडा ता. पारोळा, जि. जळगाव ह्या दोन बालिका, बेबाबाई रमेश गायकवाड (४०) व आशाबाई रामदास मोरे (४०) रा. अंजनेरा ता. पारोळा, जि. जळगाव या दोन महिला व रामदास बळीराम माेरे (४८) रा. अंजनेरा व पोपट गिरीधर पवार (४०) या दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
इन्फो
अपघातात एका दाम्पत्याचा समावेश
अपघातात मोरे दाम्पत्याचा समावेश आहे. एका ट्रॅक्टरला दोन ट्राॅल्या लावलेल्या होत्या. सर्व मजूर हे रस्त्यांच्या कामांसाठी चालले होते. संगमनेर येथून मुळाणा बारीतून जात असताना ट्रॅक्टरवरचा ताबा सुटला व तो मोठ्या दगडाला धडकला. तेथे ट्राॅली उलटून सदर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. जखमींना तातडीने वणी रुग्णालयात हलवण्यात आले. या वेळी वणीतील खासगी डॉक्टरांनी येऊन जखमींवर उपचार सुरू केले.
इन्फो
अपघातातील जखमी
सागर रमेश गायकवाड (२३) रा. अंजनेरा, ता. पारोळा, जि. जळगांव, सुरेखा अशोक शिंदे (२२) व लक्ष्मण अशोक शिंदे (२१) रा. हिंगोणा, ता. धरणगांव, जि. जळगांव, संगीता पोपट पवार (४५), सुवर्णा पोपट पवार (१३), विशाल पोपट पवार (११), आकाश पोपट पवार (१५), गणेश बापू पवार (७), बापू पवार (४५) रा. उंदिरखेडा, ता. पारोळा जि. जळगांव , तनु दीपक गायकवाड (३), दीपक बाबुलाल गायकवाड (३०) अनुष्का दीपक गायकवाड (१) मनीषा दीपक गायकवाड (२४) व तिची दोन वर्षांची मुलगी, कुसुंबा ता. जि. जळगांव, प्रिया संजय म्हस्के (३) रा. जामनेर जि. जळगांव, अजय नवल बोरसे (२१) रा. मिराड ता. भडगांव जि. जळगांव.