नाशिक : जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीने व जिल्हा परिषदेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २४ तासांचा अल्टिमेटम देताच त्याचा परिणाम होऊन गुरुवारी (दि.१२) जिल्हा बॅँकेच्या अधिकाºयांनी जिल्हा परिषदेत येऊन कबूल केल्याप्रमाणे सहा कोटींची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग केली.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक ती काय पावले उचलावीत, यासंदर्भात पॅनलवरील कायदेशीर सल्लागारांचे मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हा बॅँकेवर जिल्हा परिषदेकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व सभापती व जिल्हा परिषद सदस्यांसह शुक्रवारी (दि.१३) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार केल्याचे समजते. बुधवारी (दि.११) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या कक्षात तब्बल दोन तास ठेकेदार संघर्ष समितीचे पदाधिकारी व जिल्हा बॅँकेच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली होती. बेरोजगार अभियंता संघटनेचे रामनाथ शिंदे, सभापती यतिन पगार, जिल्हा मजूर संचालक शशिकांत आव्हाड, निसर्गराज सोनवणे यांच्यासह संदीप वाजे, किरण देशमुख, अनिल आव्हाड,अनिल चौघुले, सचिन कापडणीस, दशरथ कांडेकर, दीपक अहीरे, सुनील अहेर, अजित सकाळे,चंद्रशेखर डांगे यांनीही आक्रमक भूमिका मांडली होती. यावेळी विनायक माळेक यांनी जिल्हा बॅँकेने जिल्हा परिषदेचे पैसे देण्यासाठी जुनी इमारत गहाण ठेवावी, तसेच २४ तासात उर्वरित पैशांची तरतूद न केल्यास जिल्हा परिषदेने जिल्हा बॅँकेवर गुन्हा दाखल करावा, असा पवित्रा घेतला होता.
जिल्हा बॅँकेकडून सहा कोटी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:23 AM