नाशिक : पहिल्या लाटेनंतर जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्या २९ डिसेंबरला प्रथमच दोन हजारांखाली आली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेत एप्रिलअखेरीस उपचारार्थी संख्या ४७ हजारांवर पोहोचल्यानंतर जूनपासून उपचारार्थी संख्येत वेगाने घट आली. डिसेंबरअखेरनंतर थेट सहा महिन्यांनी बुधवारी (दि. ७) उपचारार्थी रुग्णसंख्या १८१४ पर्यंत खाली आली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊन दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८४०४ पर्यंत पाेहोचली आहे.
डिसेंबरअखेरीस कमी होऊ लागलेली उपचारार्थी रुग्णसंख्या २९ डिसेंबरला १९७७ पर्यंत आली होती. त्यानंतर ती सुमारे महिनाभर दोन हजारांखाली राहून २५ जानेवारीला सर्वात कमी म्हणजे १२५० पर्यंत खाली आली होती. मात्र, त्यानंतर काही प्रमाणात रुग्णवाढीला प्रारंभ होऊन मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली हाेती. मात्र, बुधवारी उपचारार्थी रुग्णसंख्या पुन्हा २ हजारांखाली आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.
दरम्यान, बुधवारी नवीन १७८ बाधित, तर २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधितांमध्ये ५६ नाशिक मनपा, ११० नाशिक ग्रामीण, जिल्हाबाह्य १०, तर मालेगाव मनपाच्या २ रुग्णांचा समावेश आहे. तसेच बुधवारच्या १० बळींमध्ये नाशिक मनपाचे ५, तर नाशिक ग्रामीणच्या ५ बळींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.४२ वर पोहोचले असले तरी, प्रलंबित अहवालांची संख्या अद्यापही ११३३ वर गेली आहे.