नाशिक : सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६.८० टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढली आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने केलेली उपाययोजना व मतदान करवून घेण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवार, समर्थकांचे प्रयत्न कामी आले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी जिल्ह्यातील २६४६ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान घेण्यात आले. काही ठिकाणी मतदारांनी प्रशासनाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्काराच्या घटना घडल्या असल्या तरी, संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ६९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी २४ लाख २६ हजार ७३५ एकूण मतदार पात्र होते. त्यात १२ लाख ७४ हजार २५२ पुरुष व ११ लाख ५२ हजार ४७९ महिलांचा समावेश होता. त्यापैकी मंगळवारी ९ लाख ६ हजार ९८५ पुरुष व ७ लाख ६७ हजार ५१९ महिला अशा प्रकारे १६ लाख ७४ हजार ५०५ मतदारांनी मतदान केले. सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी ६.८० टक्क्याने अधिक असून, २०१२ मध्ये जिल्ह्यातील ६२.२० टक्के मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. त्यामानाने यंदा मतांचा टक्का चांगलाच वाढला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कळवण, निफाड व नांदगाव या तीन तालुक्यांत मतांच्या टक्केवारीत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यात पेठ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ७६.५७ टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत हाच विक्रम सुरगाणा तालुक्यात नोंदविला गेला होता. २०१२ मध्ये सुरगाणा तालुक्यात ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून विक्रम प्रस्थापित केला. यंदाच्या निवडणुकीत मात्र सुरगाण्याची टक्केवारी कमालीची घटली आहे. जवळपास अकरा टक्के मतदान या तालुक्यात घटल्याची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. (प्रतिनिधी)
सहा टक्के मते वाढली
By admin | Published: February 23, 2017 12:31 AM