नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तत्कालीन मुख्याध्यापक दिनकर पवार यांच्या कार्यकाळात सुमारे २३ लाख खर्चाच्या सहा शाळाखोल्यांची बांधकामे सहा वर्षे उलटूनही अपूर्ण असल्याने बुधवारी (दि. १४) ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेत धडक दिली.यावेळी उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे यांच्या कक्षात दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथील ग्रामस्थांनी धाव घेत सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सहा शाळा खोल्यांची बांधकामे आता सहा वर्षे उलटूनही अपूर्णच असल्याने संबंधित तत्कालीन मुख्याध्यापक दिनकर पवार यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली. या सहा शाळा खोेल्यांच्या कामांसाठी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन त्यातील २० लाखांचा खर्च होऊनही प्राथमिक शाळेच्या सहा खोल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. शाळा खोल्यांना प्लॅस्टर नाही, दरवाजे खिडक्या नाहीत, त्यामुळे संबंधित २० लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केलेल्या खातेचौकशीत तत्कालीन मुख्याध्यापक दिनकर पवार दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणे यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोेलन मागे घेतले. सहा वर्षांपासून सहा शाळाखोल्यांचे काम अपूर्ण असल्याने शिक्षण व बांधकाम विभागाची ‘ढिलाई’ उघड झाली आहे. (प्रतिनिधी)
सहा वर्षे उलटूनही सहा शाळा खोल्या अपूर्ण
By admin | Published: September 15, 2016 12:17 AM